पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – न्यायालयात दाखल केलेला दावा मागे न घेतल्याने महिला वकिलाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली. याप्रकरणी एका वकील महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एका २७ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला वकिलाचा आरोपी तरुण हा आतेभाऊ आहे. महिला वकिलाने त्याच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता.
दावा मागे घेण्यासाठी आरोपी तिला त्रास देत होता. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वकील महिला शिवाजीनगर भागातील कार्यालयात निघाली होती. त्या वेळी कार्यालयाच्या आवरात तरुणाने वकील महिलेला अडवले.
माझ्याविरुद्ध न्यायालयात दाखल केलेला दावा मागे का घेतला नाही. माझ्याकडे तुझी छायाचित्रे आहेत. कार्यालयातील सहकाऱ्यांना छायाचित्रे दाखवितो, अशी धमकी देऊन त्याने महिला वकिलाचा विनयभंग केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सपकाळे तपास करत आहेत.