तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – लग्नाच्या दिवशी पहाटे नवरदेवाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सकाळी तळेगाव येथे उघडकीस आली. सूरज राजेंद्र रायकर (वय २८, रा. माळी नगर, तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज याचा शुक्रवारी लग्नसोहळा पार पडणार होता. घरात सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू होती. दरम्यान, सकाळी त्याने मामाला फोन केला. “मला लग्न करायचे नाही”, असे सांगून तो घराबाहेर पडला. घरातल्या मंडळींनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, सुरज मिळून आला नाही.
काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर वाण्याचा मळा येथील विहिरीजवळ सुरज याची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना पाचारण केल्यावर संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, शुभम काकडे,
भास्कर माळी, सूरज शिंदे, गणेश गायकवाड, अनिश गराडे, ओंकार भेगडे, आकाश पवार, कमल परदेशी आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत शोध घेतला. त्यावेळी सुरज याचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे तळेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहे.
विहिरीत दुचाकी आणि पेटीही
विविध संस्थेच्या पदाधिकारी यांनी विहिरीत गळ टाकून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू असताना प्रथम गळाला एक दुचाकी लागली. त्यानंतर एक पेटीही गळाला अडकून आली. दुचाकीच्या इंजिन व चॅसी नंबरवरून मालकाचे नाव, पत्ता मिळविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिली.