पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दि. १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील महावितरणच्या वीजेच्या दरात वाढ करण्यात येत आहे. यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यात सर्वसामान्य वीजेच्या बिलांत आणखी वाढ होणार असल्याची चिन्हे आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ रोजीच्या आदेशानुसार ही दरवाढ होत आहे. राज्य वीज नियामक आयोगाने मार्च- २०२३ मध्ये दोन वर्षांसाठी दोन टप्प्यात दरवाढ मंजूर केली होती. त्यानुसार दि.१ एप्रिल २०२३ च्या तुलनेत दि.१ एप्रिल २०२४ पासून सर्वच संवर्गातील ग्राहकांचा स्थिर आकार वाढेल. घरगुती संवर्गातील सिंगल फेससाठी पूर्वी ११६ रुपये लागायचे. आता दि.१ एप्रिल २०२४ पासून १२८ रुपये लागतील. थ्री फेससाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागतील.
वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये, सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या ग्राहकांना शून्य ते २० किलोवॉटसाठी पूर्वीच्या ११७ रुपयेएवजी १२९ रुपये, २० ते ४० किलोवॉटच्या ग्राहकाला १४२ रुपयेऐवजी १५६ रुपये, ४० किलोवॉटवरील ग्राहकाला पूर्वीच्या १७६ रुपयेएवजी १९४ रुपये स्थिर आकार लागेल.
कृषी ग्राहकांना (मीटर नसलले) ५ हॉर्सपॉवरपर्यंत पूर्वीच्या ४६६ रुपयांऐवजी ५६३ रुपये, लघु औद्योगिक ग्राहकांना २० किलोवॉटपर्यंत ५३० रुपयांऐवजी ५८३ रुपये स्थिर आकार लागेल. पथदिव्यांसाठी पूर्वीच्या १२९ रुपयांऐवजी आता १४२ रुपये, सरकारी कार्यालये व रुग्णालयांना २० किलोवॉटपर्यंत पूर्वीच्या ३८८ रुपयांऐवजी आता ४२७ रुपये स्थिर आकार लागेल.
या सर्व ग्राहकांना वेळोवेळी गरजेनुसार खुल्या बाजारातून घेतल्या जाणाऱ्या विजेच्या वाढीव खर्चानुसार इंधन अधिभार लागतो. गेल्यावर्षी इतकाच इंधन अधिभार पकडल्यास आणि त्यामध्ये वाढलेल्या स्थिर आकाराची रक्कम जोडल्यास ही एकत्रित वीज दरवाढ १० टक्केपर्यंत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वाढलेला स्थिर आकार रुपयांमध्ये
वर्गवारी दि.१ एप्रिल २०२३ दि.१ एप्रिल २०२४
घरगुती (सिंगल फेस) ११६ १२८
घरगुती (थ्री फेस) ३८५ ४२४
वाणिज्यिक ४७० ५१७
सा. पाणी पुरवठा (- २० केडब्लू) ११७ १२९
कृषी (मिटर नसलेले) ५ एचपीपर्यंत ४६६ ५६३
लघु औद्योगिक (२० केडब्लूपर्यंत) ५३० ५८३
पथदिवे १२९ १४२