पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात आता नव्याने ५०० चालक प्रशिक्षणानंतर रूजू होणार आहेत. तत्पुर्वी यातील ८६ चालक प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रूजू झाले आहेत. ९० चालकांचे प्रशिक्षण अंतीम टप्यात आहे. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांची असलेली अपुरी संख्या भरून निघेल आणि मार्गावरील बसची संख्या वाढविणे एसटी प्रशासनाला शक्य झाले आहे.
एसटीच्या ताफ्यात ८५३ बस असून, त्यातील जवळपास दररोज ८०० बसच्या माध्यमातून मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नाशिक यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सेवा देत आहे. मात्र, पुणे एसटी विभागातील चालकांची संख्या तुलनेने कमी असल्यामुळे आगार प्रमुखांना बस मार्गावर सोडताना चांगलीच कसरत करावी लागते.
त्यामुळे बसच्या फेऱ्या वाढविताना अडचणी येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत पुणे विभागासाठी ५०० चालकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
यातील ८६ चालक प्रशिक्षण पूर्ण करून सेवेत रूजू झाले असून, ९० चालकांचे प्रशिक्षण अंतीम टप्यात आहे. त्यामुळे पुढील महिन्यात २०० चालक कामावर रूजू होतील. तर टप्याटप्याने अन्य ३०० कर्मचारीही प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सेवेत रूजू होतील, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे एसटी प्रशासनावर येणार ताण आता कमी होणार आहे.
पुणे एसटी विभागाअंतर्गत १ हजार ४०० चालक तर १ हजार २२३ वाहक आहेत. सध्या मार्गावर ८००च्या जवळपास बस धावत असून, पुढील दोन ते तीन महिन्यांत प्रवाशांच्या सेवेसाठी टप्याटप्याने नव्याने ई-बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या बसची संख्याही वाढणार असून, चालक संख्याही वाढलेली आहे. – प्रमोद नेहूल, पुणे विभाग नियंत्रक, एसटी