पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने “सीव्हीजीएल’ हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. दरम्यान, गैरप्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे,
याबाबत जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी माहिती दिली. लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी. तसेच निवडणुकीत कोणते अनधिकृत प्रकार होऊ नये. लोकसभा निवडणुकीत 100 टक्के आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवारांनी करावे, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे.
आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देण्यासाठी या अॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ काढून तो अपलोड करावा लागणार आहे. यासाठी या अॅप वरून आचारसंहिता भंगाची माहिती दिल्यास ती जिल्हा प्रशासनाकडे येईल. जिल्हा प्रशासनाकडून ही तक्रार संबधित लोकसभा मतदारसंघाकडे पाठवेल.
त्यानंतर त्या मतदारसंघातील भरारी पथक संबंधित घटनास्थळी जाऊन त्यावर कार्यवाही करणार आहे. अक्षांक्ष व रेखांशाद्वारे प्रशासनाला लोकेशन समजणार आहे. त्यामुळे अधिकची माहिती तक्रारदाराला द्यावी लागणार नाही.
नागरिकांसाठी आणखी दोन अॅप
– व्हीएचए या अॅपद्वारे मतदार आपले नाव मतदार यादीत शोधू शकतात. तसेच मतदान केंद्राची माहिती मिळेल. तसेच मतदान ओळखपत्र या अॅपद्वारे डाऊनलोड करून घेता येणार आहे
– केवायसी -ईसीआय या अॅपमध्ये निवडणुकीतील उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र, गुन्हे दाखल असेल तर त्याची माहिती नागरिकांना मिळेल.