नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊर्जा कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धन उपायांच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि भूतान यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली.
या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून, ऊर्जा कार्यक्षमता कार्यालयाने विकसित केलेल्या स्टार लेबलिंग कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन घरगुती क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी भूतानला मदत करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे.
भारताच्या अनुभवा आधारे भूतानच्या हवामानाशी सुसंगत इमारत बांधणी संदर्भातील निकष तयार केले जातील. ऊर्जा लेखापरीक्षकांचे प्रशिक्षण संस्थात्मक करून भूतानमध्ये ऊर्जा व्यावसायिकांचा एक समूह तयार करण्याचा मानस आहे.
किरकोळ विक्रेत्यांच्या प्रशिक्षणामुळे तारांकित दर्जाच्या उपकरणांमधून होणाऱ्या बचतीबाबत, ऊर्जा कार्यक्षम उत्पादनांचा प्रसार ग्राहकांपर्यंत होण्यास मदत होईल. मानके आणि लेबलिंग योजना विकसित आणि अंमलात आणण्याच्या भूतानच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.
अन्न सुरक्षेच्या क्षेत्रातील सहकार्याबाबत भूतान सरकारच्या अन्न आणि औषध प्राधिकरण आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्यातील करारावर स्वाक्षरी करण्यास देखील मान्यता दिली गेली.