पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कर्करोग होऊच नये, यासाठी जीवनशैलीतील आवश्यक बदल, लवकर निदान होण्यासाठी तपासणींची गरज आणि योग्य उपचार पद्धती याविषयी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. संजय देशमुख व डॉ. सुमित शहा यांनी मार्गदर्शन केले.
टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) येथे कर्करोग जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी महिला मंडळांनी सादर केलेल्या कर्करोग जनजागृतीपर नाट्य व लोककलेतून संदेश दिला.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजू वरयाणी, सचिव डॉ. गीतांजली शर्मा, एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी डॉ. संजय पाटील व उपाध्यक्ष डॉ. सुनील इंगळे आदींनी या निमित्ताने अनेक उपक्रम आयोजित केले होते. कर्करोगाविषयी माहिती देणारे प्रदर्शन, कर्करोग मुक्त झालेल्या यशस्वी योध्यांचे अनुभव कथन आणि सन्मान यावेळी करण्यात आला. पुणे मनपा अग्निशमन कर्मचारी मेघना सकपाळ यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कर्करोग निदान करण्यासाठी तोंडाची तपासणी शिबिर आयएमए आणि प्रोलाइफ कॅन्सर सेंटर यानी आयोजित केले होते. या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. या निमित्ताने आयोजित केलेल्या कर्करोग पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. डॉ. गीतांजली शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.