पाथर्डी, (प्रतिनिधी): आता निवडणुकांच्या चर्चेला सुरुवात झाल्यापासून अनेक मंडळी फिरायला येत असून, प्रचार कसा करावा, काय करावा यासाठी अनेकांच्या भेटीगाठी सुरूआहे. मात्र, आपण पाच वर्षात विकासाचे भरीव कामे केली असून विकास कामावर आपल्याला प्रचार करायचा आहे.
या लोकसभा निवडणुकीत खासदार विखे यांना मागील वर्षीपेक्षाही जादा मताधिक्य या निवडणुकीत पाथर्डी तालुक्यातून द्यायचे आहे. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत दोघांच्या मतांमध्ये वाढ करून सारखे मतदान कसे होईल, त्यासाठी कार्यकर्त्यांना जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक, तांडा सुधार, लेखाशीर्ष, अर्थसंकल्प, राज्यस्तरीय दलितवस्ती योजना व आमदार स्थानिक विकास निधी योजनेतून विविध विकास कामे व विद्युत पुरवठा करणे, नवीन विद्युत रोहित्र बसवणे, ग्रामपंचायत कार्यालय या एकुण सुमारे अकरा कोटींच्या कामाचे आमदार राजळे यांच्याहस्ते लोकार्पण व शुभारंभ करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नारायण पालवे, मधुकर देशमुख, रामकिसन काकडे,रवी आरोळे, पुरुषोत्तम आठारे,पप्पू काळे, शिवाजी काकडे भाऊसाहेब मरकड,सुनिल माघाडे, अशोक कराळे, नारायण काकडे, बाबासाहेब किलबिले,दिगंबर भवार आदी उपस्थित होते.
त्या ठेकेदाराची बिल काढू नका
पाथर्डी तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम नुकतेच झाले होते. मात्र, त्या कामांमध्ये काही त्रुटी होत्या. त्याबाबत ग्रामस्थांनी आमदार राजळे यांच्याकडे तक्रार केली. त्याची तत्काळ दखल घेऊन राजळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत रस्त्याच्या त्रुटी दुरुस्त करून घ्या, तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा न करण्याची तंबी दिली.