Bhopal – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वल्लभ भवनच्या (मंत्रालय) तिसऱ्या मजल्यावर आज भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दूरवरून दिसत होते. इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली. मंत्रालय इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली.
तिसऱ्या मजल्यावर ठेवलेल्या जुन्या फाइल्स आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आग लागल्याचे समजताच मंत्रालयाच्या इमारतीत एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
झोन-2 च्या डीसीपी श्रद्धा तिवारी यांनी सांगितले की, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे, तर चौथ्या मजल्यावरील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, वल्लभ भवनच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे माझ्या माहितीत आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मी सीएसला त्यावर देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. अशी कोणतीही घटना पुन्हा घडू नये, यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत. अशी घटना पुन्हा होणार नाही अशी आशा आहे. वल्लभ भवन हे राज्य सरकारचे सर्वात मोठे कार्यालय आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची कार्यालये येथे आहेत. सरकारी खात्यांची अनेक कागदपत्रेही येथे वल्लभ भवनात ठेवण्यात आली आहेत.