X rolls out Audio-Video Calling Feature: उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटर अर्थात एक्सवर अनेक बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘एक्स’ अॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल हे नवं फीचर लॉंच करण्यात आले. मात्र ही सुविधा सुरूवातीला केवळ ब्लू-टिक असणाऱ्या यूजर्सना मिळत होती. यासाठी ब्लू सबस्क्रिप्शन घ्यावे लागत होते आणि त्यासाठी मासिक शुल्क भरावे लागत होते. परंतु आता हे फीचर सर्व युजर्संना वापरता येणार आहे. विशेष म्हणजे सर्व यूजर्सना ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एक्स प्लॅटफॉर्म अभियंता एनरिक बॅरागन यांनी ही घोषणा केली. यामुळे आता वापरकर्ते X Apps वरून Whatsapp प्रमाणे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत. आधी हे फीचर फक्त पेमेंट सब्सक्राइबर्ससाठी होते, पण आता सर्व X यूजर्स या सुविधेचा आनंद घेऊ शकतील.
एनरिकने आपल्या एक्स पोस्टमध्ये सांगितलं की, “आम्ही नॉन प्रीमियम यूजर्ससाठी हे फीचर रोलआउट करत आहे. याच्या मदतीने आता सामान्य यूजर्सही एक्सवरुन कॉलिंग करू शकणार आहेत. जर तुम्हाला हे अपडेट अद्याप मिळालं नसेल, तर अॅप अपडेट करून पहा. तरीही हे फीचर मिळालं नसेल, तर तुम्हाला थोडं थांबावं लागेल.”
मागील वर्षी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर केले लॉंच
गेल्या वर्षी एलॉन मस्क यांच्या X प्लॅटफॉर्मवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचर्स सादर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ते आयओएस वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला हे वैशिष्ट्य प्रीमियम सदस्यांसाठी मर्यादित होते. यानंतर, या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर Android वापरकर्त्यांसाठी देखील जारी करण्यात आले होते, परंतु आतापर्यंत ते केवळ प्रीमियम सदस्यांपुरते मर्यादित होते.
मस्क यांनी दिले होते संकेत
जानेवारीच्या उत्तरार्धात मस्क यांनी संकेत दिले होते की ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल फीचर आणले जाईल. मात्र, त्यापूर्वी त्यांनी काही चाचण्या केल्या त्यानंतर हे फीचर यूजर्ससाठी देण्यात आले आहे.