पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अंडाशयाला झालेल्या दुर्मिळ विकारावर यशस्वीपणे उपचार करण्यात डाॅक्टरांच्या चमूला यश आले. त्यामुळे 13 वर्षीय प्रिया (नाव बदललेले आहे) वेदनामुक्त झाली. डाॅक्टरांनी प्रियावर लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टॉमी करून एक मोठे व गुंतागुंतीचे ओव्हरीयन सिस्ट काढले. मासिक पाळी सुरू न झालेल्या मुलींमध्ये अशाप्रकारचे सिस्ट असणे ही अतिशय दुर्मिळ बाब असल्याचे आॅब्स्टरिक्स विभागाच्या प्रमुख आणि संचालिका डॉ. मिनी साळुंखे यांनी सांगितले.
२०२३ च्या आॅक्टोबर महिन्यात प्रियाला पोटदुखी सुरू झाली. प्राथमिक सोनोग्राफी आणि एमआरआयमध्ये बऱ्यापैकी मोठे ओव्हरीयन सिस्ट असल्याचे आढळून आले. अंडाशय स्वतंत्रपणे नीट दिसत नव्हते. विशेष म्हणजे, सीए १२५ हे लक्षण (अंडाशयाचा कर्करोग असलेल्या लोकांमध्ये आढळतो) वगळता इतर सर्व ट्यूमर मार्कर सामान्य श्रेणीत होते. या वेळी सह्याद्री हॉस्पिटल्समधील आॅब्स्टरिक्स विभागाच्या प्रमुख आणि संचालिका डॉ. मिनी साळुंखे, गायनॅकोलॉजिस्ट आणि आॅब्स्टट्रीशियन डॉ. गौरी जगदाळे आणि डॉ. सुनील यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टॉमी ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला.
डॉ. गौरी जगदाळे म्हणाल्या, प्रियाच्या वयाच्या रुग्णांमध्ये अशी व्याधी असणे हे खूपच दुर्मिळ आहे. आम्ही केलेल्या लॅप्रोस्कोपिक सर्जरीमुळे प्रियाला वेदनांपासून मुक्ती तर मिळालीच; पण त्याबरोबरच पेडियाट्रिक गायनॅकॉलॉजी क्षेत्रासाठी शिकण्याची व संशोधनाची एक अनोखी संधीही निर्माण झाली.