पिंपरी, (प्रतिनिधी) – लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात मोठा निर्णय आज घेण्यात आला. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 137 एकर जागा संपादीत केली जाणार आहे. या भूसंपादनाकरिता 60 टक्के निधी हा राज्य सरकार तर 40 टक्के निधी हा पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) देणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. सांगवी येथे शुक्रवारी (दि.9) पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे महापालिकेला पुण्याच्या हद्दीतील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिल्या जाणार्या 10 टक्के निधीचे अजित पवार यांनी समर्थन केले. ते म्हणाले, पुणे (लोहगाव) विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पास 2017 मध्ये प्रारंभ झाला. आता त्याचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे 476 कोटी रुपये खर्च केले आहेत. उद्घाटनानंतर विमानतळावरील एकूण चेक इन काऊंटर्स 34 होणार आहेत. तर, पाच अॅरोब्रिज होतील. तसेच प्रती तास सुमारे 2300 प्रवासी विमानतळावरील सुविधांचा वापर करू शकतील, अशा पद्धतीने विस्तारीकरणाचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की. पुण्यातील नवीन पुरंदर विमानतळाचा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही. त्यामुळे पुण्यातील लोहगाव विमानतळ सुसज्य केले जात आहे. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 137 एकर जाग संपादीत केली जाणार आहे. याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचा फॉर्म्युला अजित पवार यांनी आपल्या भषणात जाहीर केला.
संबंधितांवर कारवाईचे आदेश
पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर पुण्यात दगड व शाईफेक करण्यात आली. याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अशा घटना राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणार्या असतात. अशा घटना घडू नयेत, याकरिता संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.