सिंहगडरस्ता – सिंहगड रस्त्यावर मधुकोष सोसायटी समोरील पाटबंधारे खात्याच्या मोकळ्या जागेत राडाराडा, कचरा टाकला जात आहे. या जागेचा वापर डम्पिंग ग्राउंड म्हणून केला जात आहे. पाटबंधारे खात्याच्या कालव्यालगतच्या मोकळ्या जागेमध्ये राडारोडा, कचरा आणून टाकला जात होता. आता चक्क रस्त्यालगतच टाकण्यात येत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
मधुकोष सोसायटी समोर रात्रीच्या वेळी राडारोडा तसेच कचरा टाकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ज्या ठिकाणी पाडकाम होत आहे, तेथून पैसे घेऊन असा राडारोडा उचलला जातो तो थेट पाटबंधारेच्या सदर मोकळ्या जागेत आणून टाकला जात असल्याने अशा ठेकेदारांना हे मोकळे मैदानाच सापडले आहे. पाटबंधारे विभाग अशांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. पाटबंधारे खात्याने सदर जागा तातडीने स्वच्छ करावी, राडारोडा, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
“बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील. सदर जागा तातडीने स्वच्छ केली जाईल.” – मोहन भदाणे, उपअभियंता, जलसंपदा विभाग