लोणंद – लोणंद नगरपंचायतीकडून पाणी पुरवठा विभागाच्या कामांच्या संदर्भात सोमवारी (दि 5) रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. यामधे सर्व कामे एकाच कंत्राटदारास देण्याच्या सत्ताधार्यांच्या निर्णयावर विरोधी गटाने तीव्र आक्षेप घेतला. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत यामुळे नगरपंचायतीचे आर्थिक आणि धोरणात्मक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला.
पत्रकार परिषदेस जेष्ठ नेते आनंदराव शेळके , नगरसेवक प्रवीण व्हावळ, नगरसेविका, दिपाली निलेश शेळके, तृप्ती घाडगे, दिपाली संदीप शेळके, ज्योती डोनीकर, युवानेते संदीप शेळके, राहुल घाडगे, निलेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटाकडून एकाच कंत्राटदारास सर्व कामे देण्याचा ठरावावरून विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर या ठरावावर मतदान घेत सदर वादग्रस्त ठराव 8 विरूद्ध 5 अशा फरकाने सत्ताधार्यांकडून मंजूर करून घेण्यात आला आहे. विरोधी गटाकडून पत्रकार परिषदेमधे नगरपंचायतीने सर्व कामे एकाच कंत्राटदारास देणे हे संस्थेच्या आर्थिक हिताचे नाही.
यामधून स्पर्धात्मक दराचा फायदा संस्थेला होणार नाही. तसेच, सर्व कामे एकाच कंत्राटदारास दिल्यास प्रत्येक कामासाठी त्या कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागेल हे धोक्याचे आहे. याशिवाय प्रत्येक कामासाठी लागणारे कौशल्य हे एका कंत्राटदाराकडे मिळणे अवघड असल्याने कामाची गुणवत्ता राखणेही कठीण आहे. याकामी वेगवेगळ्या कंत्राटदारांशी समन्वय साधण्याचं काम हे त्या त्या विभाग प्रमुखाचे असल्याने या जबाबदारी पासून पळ काढून कर्तव्यात कुचराई करण्याची योजना सत्ताधार्यांच्या सोबत प्रशासनातील काही अधिकार्यांनी केलेली आहे काय ? असा प्रश्न यातून निर्माण होत असल्याचे सांगत सगळी कामे एकाच कंत्राटदारास देण्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत काय? असा सवाल विरोधी गटाने उपस्थित केला.
या गौडबंगालाचा खुलासा करा
सर्व कामे एकत्रितरित्या एकाच कंत्राटदारास देण्याचा प्रकार हा लोणंदच्या आज पर्यंतच्या इतिहासात कधीच झालेला नाही. या विषयासंदर्भात विरोधी गटाकडून माहितीची टिपणी देण्याचा आग्रह केलेला असताना देखील कोणतीही सविस्तर माहिती लेखी स्वरूपात दिलेली नाही. त्यामुळे यामध्ये काहीतरी गौडबंगाल असण्याचा संशय निर्माण होतो. ज्या कंत्राटदारांच्या तक्रारी कामगार आयुक्तांच्या समोर सुरु आहेत त्या कंत्राटदारांस निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करू नये, अशी मागणी विरोधी गटाने केली आहे.