पुणे – सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, प्लॅस्टिक वापर करणे, पोस्टर लावून शहर विद्रुपीकरण करण्यासह धूळ आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर पुणे महापालिकेच्या कोथरूड, बावधन क्षेत्रीय कार्यालयातील भरारी पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर जे व्यावसायिक नियमांचे पालन करतात, त्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.
कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “दमदार भरारी पथक” स्थापन करून आजपासून प्रभाग १० आणि १२ मधील भाजी मंडई, हॉटेल, दुकाने, फळविक्रेते यांच्यावर प्लॅस्टिक वापराबाबत कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकाणाऱ्या २२ नागरिकांवर कारवाई केली, तसेच धूळ आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्यां व्यावसायिकांवर कारवाई करून एकूण ७६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, विभागीय कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त संतोष वारूळे,
महापालिका सहायक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, हणुमंत चाकणकर, संतोष ताटकर, सूरज पवार, वैजीनाथ गायकवाड, राम गायकवाड यांनी ही कारवाई केली. या पथकाच्या माध्यमातून जनजागृती करत, प्लॅस्टिकचा वापर न करणाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.