सोलापूर (प्रतिनिधी) – अयोध्येतील श्री राम मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडल्यानंतर आता अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि सध्या वादाचा केंद्रबिंदू असलेल्या वाराणसी आणि मथुरा येथे मंदिर पाडून मशिद उभारण्यात आल्याची चर्चा आहे.
अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या निमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीमध्ये सोलापुरातील एका भागामध्ये दगडफेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर आणि अन्य जिल्ह्यातील मंदिरांची पाहणी करण्यासाठी आमदार नितेश राणे शनिवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते .
सोलापूर शहरातील लोधी गल्ली परिसरात त्यांनी पुरातन श्री राम मंदिरात पूजा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणी म्हणाले, काशी आणि मथुरेत हिंदू मंदिरांचे पुरावे आढळले आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिराचा उत्सव साजरा केला.
आता लवकरच काशी आणि मथुरेत सुद्धा हिंदू मंदिर उभे केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा जय श्री कृष्णाची घोषणा सर्वांना ऐकायला मिळेल. जे आमचे आहे ते आम्ही हक्काने परत घेणारच आणि ते नेहमीच आमचे होते,असेही आमदार राणे यावेळी बोलताना म्हणाले.