पुणे – विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटीची संधी कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली आहे. राज्यातील शेतकऱ्याचे देशाबाहेर दौरे आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी दि.३१ जानेवारी २०२४ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रांस, स्पेन, स्वित्झरलंड, ऑस्ट्रीया, न्यूझीलंड, नेदरलंड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलंड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. अभ्यास दौऱ्याकरिता लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. त्याच्या नावे चालू कालावधीचा ७/१२ व ८-अ उतारा असावा. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र (प्रपत्र १) अर्जासोबत सादर करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.