पुणे – अयोध्या येथील राम मंदिराचे लोकार्पण आणि श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा सोमवारी होत आहे. या उत्साहात सोशल मीडिया युजर्सदेखील सहभागी झाले आहेत. साधारणपणे मागील आठवड्यापासून रामनामाचा महिमा, रामाचे फोटो, स्टेटस आणि रिंगटोनदेखील ट्रेंडिंग असल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर प्रामुख्याने एक्स, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यांसारखे विविध प्लॅटफॉर्म राममय झाले आहेत. सध्या सर्च इंजिन गुगलवर अयोध्या, रामजन्मभूमी आणि राम हे शब्द सर्वाधिक सर्च केले जात आहेत. केवळ भारतीयच नाही तर परदेशीही फेसबुक आणि एक्सवर जय श्री राम लिहित आहेत. अमेरिका, भूतान आणि नेपाळमधील युजर्सदेखील राम मंदिराशी संबंधित पोस्ट्स शेअर करत आहेत.
नवीन पिढीला कारसेवेतील संघर्षांची आठवण करून देण्यासाठी जुने व्हिडिओही पोस्ट केले जात आहेत. व्हॉट्सअॅपवरील बहुतांश ग्रुप्स भगवे झाले आहेत. जय श्री राम लिहून भगवान श्रीरामाचे चित्र, स्टीकर आणि भगव्या ध्वजाचे फोटो पाठवले जात आहेत. या जल्लोषात सहभागी होत काही श्रीलंकन युजर्सनीही त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून रामावरील विश्वास व्यक्त केला आहे.
एक्सवर अयोध्या ट्रेंडिंग
अयोध्या राम मंदिर, श्री रामलल्ला या नावाने एक्सवर ट्रेंड सुरू आहे. तर, फेसबुकवर श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या व्हेरिफाइड अकाउंटला फॉलो करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या पेजवर ट्रस्टतर्फे दररोज कार्यक्रमाची माहिती दिली जात आहे.
डीपी, कॉलर ट्यूनवर देखील
गेल्या आठवडाभरात रामाचे नाव, सीतेसह वनवासाहून परत येतानाचे कल्पनाचित्र, यासह रामाची भजने, मंत्र, श्लोक शेअरिंग जोरदारपणे केले जात आहे. शिवाय, डीपी म्हणून रामाचे चित्र लावले जात आहे. काही भक्तांनी रामाची गाणी काॅलर ट्युन, रिंगटोन म्हणूनही लावली आहे.