पुणे – राज्यातील १४ ते १८ वयोगटातील युवकांना नीट वाचायला व गणित सोडवायला येत नाही. ही बाब प्रथम या संस्थेने जाहीर केलेल्या अॉन्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल (असर) अहवालातून उघड झालेली आहे.
असर २०२३ चा ‘बियॉन्ड बेसिक्स’चा अहवाल जाहीर झाला आहे. भारतातील ग्रामीण भागामधील १४ ते १८ वर्ष युवकांवर लक्ष केंद्रित करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षण अहवालानुसार केवळ ५.६ टक्के युवक व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत किंवा त्या संदर्भातील इतर अभ्यासक्रम करत आहेत. त्यातही अनेक युवक कमी कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. शिक्षण घेत असताना १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत काम करणाऱ्या मुला मुलींची संख्या सुद्धा लक्षणीय असल्याची बाब समोर आलेली आहे.
मुलांना धडावाचन येत नाही
वय वर्ष १४ ते १८ वयोगटातील सुमारे पंचवीस टक्के युवकांना आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा वाचता येत नसल्याचे समोर आले. अर्ध्यापेक्षा जास्त युवक तीन ते एक अंकापर्यंतच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकले नाहीत. केवळ ४३ टक्के युवकांनी बरोबर उत्तरे दिली. इयत्ता तिसरी ते चौथीच्या वर्गातील प्रश्नांवर या युवकांशी संवाद साधण्यात आला.
अर्ध्यापेक्षा अधिक युवकांनी ५७.३ टक्के इंग्रजी भाषेतील वाक्य वाचली. त्यातील तीन चतुर्थांश युवकांना त्याचा अर्थ सांगता आला. मुलांच्या तुलनेत मुली आपल्या क्षेत्रीय भाषेतील इयत्ता दुसरीचा धडा चांगल्या पद्धतीने वाचत आहे. गणित आणि इंग्रजीमध्ये मुलींच्या तुलनेत मुले अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करत असल्याचे दिसून आले.
अकरावीपासून कला शाखेकडे अधिक कल
१४ वर्षे वयातील ३.९ टक्के युवक आणि अठरा वर्षाचे ३२. ६ टक्के युवक शिक्षण घेत नसल्याचे दिसून आले. त्यातही बहुतांश विद्यार्थी हे कला शाखेतील शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीच्या पुढील ५५.७ टक्के युवक हे कला शाखेचे शिक्षण घेत असून त्यात मुलींचे प्रमाण २८.१ टक्के तर मुलांचे प्रमाण ३६.३ टक्के आहे.