नवी दिल्ली – न्यूझिंलंडमधील दुकानांमध्ये भुरटेगिरी केल्याचा आरोप झाल्यामुळे एका खासदार महिलेने आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गोलविझ ग्राहरामन असे या खासदार महिलेचे नाव असून त्या न्यूझिलंडमधील ग्रीन पार्टीच्या सदस्या आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले आहे. स्थानिक प्रतिष्ठित बुटिकमध्ये वारंवार उचलेगिरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
आज ऑकलंडमधील स्थानिक न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याचे समन्स त्यांना बजावण्यात आले आहे. पोनसोनबे येथील दुकानामध्ये गेल्यावर्षी दिनांक २१ आणि २३ डिसेंबरला किरकोळ वस्तूंची उचलेगिरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
ग्राहरामन या ग्रीन पार्टीच्या न्याय आणि विदेश विभागाच्या प्रवक्त्या होत्या. दिनांक १ फेब्रुवारीला त्या ऑकलंडमधील न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी आरोपांची माहिती मिळताच ग्राहरमन यांनी कोणतेही कारण न देता आपल्या पदाचा राजीनामा दिला. कामाच्या ताणामुळे आपल्याकडून झालेली कृती पूर्णपणे चुकीची होती, असे त्यांनी म्हटले आहे.
निवडलेल्या लोकप्रतिनिधींकडून उच्च श्रेणीच्या वर्तनाची सर्वसामान्यांची अपेक्षा केली जात असते. आपण ही अपेक्षा सार्थ करण्यास अपयशी ठरल्याचा आपल्याला खेद आहे, असे त्यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.