New Year – सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागतासाठी मुंबईकरांनी जय्यत तयारी केली आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत.
शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या मदतीला वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक,
राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण झाली असून सर्व पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण यांच्या मार्गदर्शनासाठी 22 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2051 पोलीस अधिकारी, 11 हजार 500 पोलीस कर्मचारी आदींना बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे.
त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलासह क्यूआरटी, आरसीपी, होमगार्ड जवानांना तैनात करण्यात आले आहे. बंदोबस्तात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा आदेशच पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला आहे.