कोरेगाव – मराठी संगीत रंगभूमीवरील ख्यातनाम गायक अभिनेते स्वरराज छोटा गंधर्व यांचा २६ वा स्मृतिदिन रविवार ३१ डिसेंबर २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त माहेश्वरी मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आमदार महेश शिंदे, कार्तिकस्वामी देवस्थानचे ह. भ. प. परशुराम महाराज वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे असतील.
या समारंभात सांगली येथील तरुण गायक अभिषेक काळे यांना छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख ५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर याच समारंभात कामथी येथील भजन गायक धर्मराज पवार, जैतापूरचे तबलावादक संदीप पवार, नेले- किडगावचे हार्मोनियम वादक, गायक सुभाष जाधव, भोसरे येथील मृदंगवादक हणमंतराव पुजारी व पाचवडचे सनई वादक दिलीप जाधव याना छोटा गंधर्व स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
प्रत्येकी रोख १ हजार, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरणापूर्वी या सर्व कलाकारांचे तसेच ईशान अमृत भोसले (गिटारवादक) यांचे कार्यक्रम व त्यानंतर नाट्य-भक्ती संगीताची मैफल होणार असून त्यात सुरगंधर्व पं. सुरेश साखवळकर, छोटा गंधर्वांच्या कन्या सुलभा सौदागर, गायक अभिनेते रवींद्र कुलकर्णी व अभिषेक काळे हे कलाकार सहभागी होतील. त्यांना ऑर्गन साथ संजय गोगटे, तबला साथ केदार कुलकर्णी करतील.
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन छोटा गंधर्व प्रतिष्ठानचे संस्थापक एम. बी. भोसले, अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोसावी, कार्यवाह बापूसाहेब भोसले व बालगंधर्व संगीत रसिक मंडळ (पुणे) या संस्थेचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी केले आहे.