Stock Market Updates: तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आणि वर्ष 2023 च्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला. बँकिंग, फार्मा आणि एनर्जी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारात ही वाढ दिसून आली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुरू असलेली चमक आजही कायम आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 230 अंकांच्या उसळीसह 71,336 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 105 अंकांच्या वाढीसह 21,454 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारात, आयटी, मीडिया आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स वगळता, बहुतेक क्षेत्रांचे निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो, बँकिंग, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये खरेदीमुळे दोन्ही निर्देशांक वाढीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स वाढीसह आणि सहा तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स वाढीसह आणि 8 घसरणीसह बंद झाले.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.55 लाख कोटी रुपयांची वाढ –
शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 359.08 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 356.53 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.55 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.