पुणे – कौटुंबिक न्यायालयात आणखी एक न्यायालय सुरू होणार आहे. पूर्वी कार्यरत असलेली ५ आणि आता नव्याने सुरू होणाऱ्या न्यायालयामुळे कौटुंबिक न्यायालयात आता सहा न्यायालये सुरू असणार आहेत. त्यामुळे दावे लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे. पक्षकारांसह वकिलांना त्याचा फायदा होणार आहे.
कौटुंबिक न्यायालयाचे न्यायिक क्षेत्रामध्ये दोनदा विस्तार झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाची हद्द गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा समावेश कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायिक क्षेत्रात करण्यात आला होता. या निर्णयाला वर्ष होते, तोच कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायिक क्षेत्राचा देहूरोड छावणी क्षेत्राच्या स्थानिक सीमांपर्यंत विस्तार करण्यात आला.
राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाशी चर्चा करून पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायिक क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दाव्याची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय वाढविण्याची मागणी होते होती. दरम्यान, के.ए. बागे पाटील यांची सहाव्या न्यायालयासाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. तर न्यायाधीश हेमंत गायकवाड यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी न्यायाधीश एस.बी. पराते यांची नियुक्ती झाली आहे.
“कौटुंबिक न्यायालयाच्या न्याय क्षेत्राचा विस्तार झाला आहे. आता दाव्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथे न्यायालय सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीस यश आले आहे.”- अॅड. वैशाली चांदणे, अध्यक्ष, दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पुणे