पिंपरी – तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहराचा हीट ऍक्शन प्लॅन उपयुक्त ठरणार आहे, असे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ‘हीट ऍक्शन प्लॅन’ या विषयावर विशेष कार्यशाळा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बंसल, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, पुणे नॉलेज क्लस्टरच्या अश्विनी केसकर, सुर्या फर्निटेकचे विश्वास दिक्षीत, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे, विद्या कुंभार आदी उपस्थित होते.
डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, उष्णतेमुळे मृत्युंचे प्रमाण वाढत असून दरवर्षी तापमानातही वाढ होत आहे. याचा दैनंदिन कामकाज करताना लोकांच्या जीवनावर परिणाम होत आहे. तापमान बदल व वाढत्या उष्णतेबाबत पुरेशी काळजी आणि उपाययोजना केल्या नाही तर उद्भवणा-या समस्यांचा प्रत्येकाला सामना करावा लागू शकतो. वातावरणातील कमाल तापमानात ४ डिग्री ते ५ डिग्रीपेक्षा अधिक वाढ झाली, तर उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते.
रात्री अनेक शहरांचे तापमान जास्त असते. त्यामध्ये भारतातील ४४ शहरांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागांचाही समावेश आहे. उष्णतेच्या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी पायाभूत सुविधा, जनजागृती, क्षमता निर्माण आणि परिणामकारक घटक ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे ही कुलकर्णी म्हणाल्या.
उड्डाणपुलांच्या खाली विसावा घेण्यासाठी जागा निर्माण करणे, रहदारीच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणे, शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल करणे, दुपारी १२ ते ३ दरम्यान काही भागातील वाहतूक सिग्नल बंद करणे, बांधकामांच्या ठिकाणी किंवा घराबाहेर काम करणाऱ्या कामगारांच्या वेळेत बदल करणे, पोलिस स्टेशन, दवाखाने तसेच रुग्णालयांमध्ये उष्णता आपत्कालीन प्रतिसाद पथके स्थापन करणे अशा विविध उपायांचा कार्यशाळेत समावेश होता.