पुणे – किल्ले राजगड येथे पाली दरवाजा – सदर – पद्मावती माता मंदिर, असा ढोल ताशांच्या गजरात निघालेला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा…मर्दानी खेळ …छत्रपती शिवरायांचा जयघोष … अशा उत्साही वातावरणात आग्य्राहून सुटका स्मृतिदिन किल्ले राजगड पाल खुर्द येथील खंडोबाचा माळ आणि गडावरती थाटात साजरा करण्यात आला.
पुणे महापालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ३५७ व्या आग्य्राहून सुटका स्मृतीदिनानिमित्त ‘किल्ले राजगड उत्सवा’ चे आयोजन करण्यात आले होते. वंश परंपरेने किल्लेदार सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि पद्मावती देवीचे पूजन झाले. पाल दरवाज्यावर पालखीचे पूजन करण्यात आले.
या वेळी पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, संजय दापोडीकर, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सुनील वालगुडे, संपत चरवड, समीर रुपदे, सतीश सोरटे, सुरेश परदेशी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. जिल्हा चिकित्सक ग्रामीण रुग्णालय, पुणे यांनी प्रथोमोपचार सेवा आणि रुग्ण वाहिका सेवा दिली. पुणे महापालिका सायकल क्लब या उत्सवात सहभागी झाला होता.
उत्सवाच्या पूर्वसंध्येला किल्ले राजगड खंडोबा माळावर, पाल गाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हंडे महाराज यांच्या मठात मॉसाहेब जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून खंडोबा मालावर शिव पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वेल्हा पोलिस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले.
वसंतराव प्रसादे, सूर्यकांत भोसले, संजय दापोडीकर, अरविंद महाराज, रोहिदास हंडे महाराज, इंदुबाई बापू शिर्के, बाळकृष्ण महाराज दसवडकर, ह.भ.प. दिनकर वालगुडे, नाना शिर्के, अंकुश कुळे, अनंता रेणुसे, विठ्ठल दर्डिगे, दशरथ भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ दर्डिगे, रामभाऊ दर्डिगे, पांडुरंग दर्डिगे, रामचंद्र पोळ, शिवाजीराव पोळेकर आदी उपस्थित होते.
सायली गोडबोले-जोशी यांनी राजमाता जिजाऊ नाट्याविष्कार सादर केला. आग्र्याहून सुटका या विषयी व्याख्यात्यांची व्याख्याने झाली. यावेळी माधव जगताप, रणजीत पठारे यांनी गडावरील सुधारणा, सुविधा, सुरक्षा या बाबत आढावा घेतला. पुणे महापालिका यांच्या मदतीने राजगडावरील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या सदरेचा लवकर लोकार्पण सोहळा करण्यात येईल असेही सांगण्यात आले.