खेड – खेड (ता.कर्जत) येथील येथील सहारा हनुमंत वाघमारे हिने सिंगापूर येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल डान्स स्पर्धेत सेमी क्लासिकल गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिंगापूर राज्यात आयोजित केलेल्या इंटरनॅशनल डान्स स्पर्धेसाठी सहारा हिची निवड झाली होती. सिंगापूर येथे २२ देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये सहारा वाघमारे हिने वैयक्तिक सोलो डान्स आणि ग्रुप डान्स सादर केला होता.
मूळची खेड येथील रहिवासी असलेली सहारा ही पुणे येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेत बारावीचे शिक्षण घेत आहे. तिचे वडील लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यरत असून तिने कथ्थक नृत्य प्रकारात आपली ओळख निर्माण केली आहे. सहारा वाघमारे हिने आत्तापर्यंत सुमारे सहा वेगवेगळ्या कथ्थक नृत्य परीक्षेत प्रथम श्रेणीने यश संपादन केले आहे. कथ्थक नृत्यातील सांगितिक रचनावर आधारित नृत्यरचनेत तोडे, सरगम, झुला, तराणा आदी कथक नृत्य प्रकारात सहारा हिची चांगली पकड आहे. लोणावळा येथील नादब्रह्म नृत्यालयाच्या माध्यमातून नृत्यशाळेच्या सर्वेसर्वा ज्योती भोळे यांच्या मार्गदर्शनातून तिला चमकण्याची संधी मिळाली.
गेली महिन्यात पुणे येथे पार पडलेल्या ऑल इंडिया डान्स-ड्रामा-मुझ्यिक वोकल फेस्टिवलमध्ये नादब्रह्म नृत्यालयाने मोठे यश संपादित करत अनेक पारितोषिके मिळवली होती. या फेस्टिवलमध्ये सहारा वाघमारे हिने सेमी क्लासिकल सिनियर (प्रथम क्रमांक) पटकावला होता. त्यानंतर तिला सिंगापूर या ठिकाणीही यश मिळाले. सिंगापूर येथे नादब्रह्म नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी वैयक्तिक नृत्य, जोडी नृत्य,सामूहिक नृत्य, शास्त्रीय व सेमी क्लासीकलमध्ये अनेक पारितोषिके पटकावली.