पुणे – राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत. शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही तात्काळ करावी लागणार आहे. याबाबत शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश बजाविले आहेत.
राज्यात शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अभियोग्यता चाचणी घेऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र बिंदुनामावली तपासणी, शिक्षक समायोजन अशी तांत्रिक प्रक्रिया लांबली आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची सुविधा ऑक्टोबरमध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अद्याप जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नसल्याने त्यासाठी उमेदवारांनी उपोषण, आंदोलनेही केली.
बिंदूनामावली प्रमाणित करण्याची आवश्यकता विचारात घेवून सर्व जिल्हा परिषदांची बिंदूनामावली तपासून घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. शिक्षक पदभरतीसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे जनहित याचिका दाखल आहे. शाळांना शिक्षक वेळेत शिक्षक उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही तातडीने करणे आवश्यक आहे.
राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी म्हणून पोर्टलवरील सूचना व वेळोवेळीचे शासन निर्णय विचारात घेवून रिक्त असलेले आरक्षण व जिल्हयातील विषयनिहाय रिक्त पदे नमूद करुन जाहिरात देण्याची कार्यवाही करावी लागणार आहे.
पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण, अध्यापनाचे गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पोर्टल नोंद करण्याची सुविधा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर देण्यात आलेली आहे. त्यांनतर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नोंद केलेली माहिती आपण पडताळणी करुन योग्य असल्यास रोष्टर व विषयनिहाय रिक्त पदासाठी आपल्या लॉगीनवर मान्य करावयाची आहे. त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर क्लिक केल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेकडील शिक्षक रिक्त पदांची जाहिरात जनरेट होणार आहे. आवश्यक असणारी आरक्षणनिहाय रिक्त पदे तसेच गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती पडताळणी करुन जाहिरात देण्यासाठी तयारी पुर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.