Parliament Attack – संसदेची सुरक्षा भेदण्याचा प्लॅन पूर्वनियोजित होता. काही दिवसांपूर्वी तो सहा जणांनी निश्चित केला. ते एकमेकांना चार वर्षांपासून ओळखत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सुत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी संबंधित प्लॅन आखणाऱ्यांपैकी सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोघांना लोकसभेतील (parliament attack) प्रेक्षा गॅलरीतून खाली उडी घेतल्यानंतर पकडण्यात आले.
त्याचवेळी संसदेबाहेर निदर्शने करणाऱ्या अमोल शिंदे आणि नीलम देवी या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचा साथीदार विशाल शर्मा याला गुरूग्राममधून ताब्यात घेण्यात आले. तर, ललितचा शोध पोलीस घेत आहेत. संसदेत पोहचण्याआधी ते सर्व जण विशालच्या घरी राहिले. त्याआधी त्यांनी संसद परिसराची टेहळणीही केली होती.
संसदेची सुरक्षा भेदण्याचा प्लॅन करणारे सहा जण सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात होते. शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी, मणिपूरमधील घडामोडींमुळे ते अस्वस्थ होते. समान विचारसरणी असल्याने त्यांनी सरकारला संदेश देण्याच्या उद्देशातून संबंधित कृत्य केले, अशी माहिती अमोलने प्राथमिक चौकशीत दिल्याचे सुत्रांनी सांगितले. संबंधित कृत्य करण्याची सूचना त्यांना कुठल्या व्यक्तीने किंवा संघटनेने केली का, या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत.