पुणे – पीएमपीसाठी वातानुकूलित ई-डबल डेकर बस खरेदीची योजना धोरणात्मक चूक ठरणार आहे. त्याऐवजी मेट्रो प्रवाशांना पूरक ठरणाऱ्या मिनी बसेस खरेदी कराव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केली आहे. तसेच पीएमपी प्रशासनाने डबल डेकर बस प्रस्तावाचा फेरविचार करावा, अशी सूचना त्यांनी पीएमपीचे अध्यक्ष संजय कोलते यांना केली आहे.
निम्हण म्हणाले, शहरात मेट्रोचे पूल, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग यामधून डबल डेकर धावण्यासाठी लांब पल्ल्याचे मार्ग उपलब्ध होणार नाहीत. मेट्रोच्या पुलामुळे मुठा नदीवरील पुलावरून डबल डेकर बस जाऊ शकणार नाही. सोलापूर रस्ता, सिंहगड रस्ता , सातारा रस्ता, कर्वे रस्ता येथे उड्डाणपुलामुळे डबल डेकर बसला जाता येणार नाही. त्या मार्गावर मेट्रोचाही प्रस्ताव आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठा मधून ती धाऊ शकणार नाही. तशीच परिस्थिती पिंपरी चिंचवड शहरात आहे.
निम्हण म्हणाले, सुमारे 70 ते 80 कोटी रुपये खर्चून 20 डबल डेकर बस खरेदी करण्याऐवजी तेवढ्याच किमतीत सुमारे 100 मिनी बस खरेदी करता येतील. मेट्रो स्थानकापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर गर्दीच्या भागात जाण्यासाठी प्रवाशांना त्या उपयुक्त ठरतील. त्यामुळे या प्रस्तावाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून पुणे शहरातील प्रवाशांना उपयुक्त ठरतील, अशा बस खरेदी कराव्यात, ही माझी मागणी आहे.