पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’मध्ये अधिकाधिक लोकसहभाग वाढावा या उद्देशाने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांना अभिवादन, ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’, ‘ज्ञान सरिता ग्रंथदिंडी’,आणि ‘टॅलेंट हंट’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डीईएस चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, फर्गसनचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय या महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघ, भारतीय विचार साधना, इस्कॉन हे सह – प्रायोजक आहेत
‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी साहित्यिक गप्पांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. 6) सकाळी 9.30 वाजता ‘इंटरनॅशनल बुक सर्व्हिस’ येथे हा कार्यक्रम होइल. तसेच, गुरुवारी (दि.१४) दुपारी 12 ते 1 या वेळेत जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पुस्तक वाचनाचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील पाच हजार संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
पुणे महापालिकेच्या वतीने त्याच दिवशी सकाळी 8 वाजता स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पाच हजार पालक आपल्या पाल्यांना गोष्टी सांगणार आहेत. दि. 15 डिसेंबरला तीस ठिकांणांहून ज्ञान सरिता ग्रंथ दिंड्यांचे प्रस्थान होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक आदींच्या ग्रंथ दिंड्यांचा समावेश असणार आहे.