Entertainment : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अनेक बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाहते देखील त्याचे चित्रपट पाहण्यासाठी आतुर असतात. आता लवकरच नवाजुद्दीन एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
नवाजुद्दीनने कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमाचे गोव्यात शुटिंगही सुरू झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत चित्रपटाची टीम गोव्यात शूटिंग करणार आहे. सेजल शाह या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संभाळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला 26 ऑक्टोबरपासून मुंबईत सुरुवात झाली. पहिल्या शेड्यूलमध्ये नवाजुद्दीन आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्यासोबत काही दृश्ये शूट करण्यात आली होती.
यापूर्वी प्रियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनसोबत काम करण्याचा आनंद व्यक्त केला होता. कोस्टा फर्नांडिस यांनी 90 च्या दशकात गोव्यातील सोन्याच्या तस्करीला आळा घातला होता. त्यांच्या याच कामगिरीचे चित्रपटात माहिती देणार असल्याचे म्हंटले जात आहे.
नवाजुद्दीनसह चित्रपटाची टीम गोव्यात शूटिंग करत असून या शेड्यूलमध्ये नवाजुद्दीनसोबत काही अॅक्शन सीन शूट केले जात आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘ठाकरे’, ‘बजरंगी भाईजान’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे .याशिवाय नवाजुद्दीन सेक्शन 108 या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा हड्डी हा चित्रपट रिलीज झाला होता.