घोषित केलेला 3000 रुपये पहिला हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा हेाणार
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात सभासदांना व गेटकेनधारकांना प्रतिटनी तीन हजार रुपये ऊस दर देण्याची घोषणा केली. त्यानुसार श्री छत्रपती कारखान्याने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटनी 3000 रुपयांची ऊस बिलाची रक्कम सभासदांच्या व गेटकेनधारकांच्या खात्यात वर्ग केली आहे, उद्या (मंगळवारी) ती सभासदांना मिळणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच श्री छत्रपती कारखान्याने चालू हंगामात आम्ही योग्य भाव देऊ असे सांगितले होते. हंगाम सुरू होताच 2900 प्रतिटनी पहिला हप्ता देणार असल्याची घोषणा केली; मात्र त्यानंतर काही दिवसांतच कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी त्यामध्ये शंभर रुपयांची वाढ करत पहिला हप्ता 3 हजार रुपये प्रतिटन देण्याचे जाहीर केले.
त्यावर काही मंडळींकडून कारखान्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जात असल्याने हा भाव जाहीर करण्याचे आमिष संचालक मंडळाने दाखवले असल्याची चर्चा केली गेली; मात्र आज कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ही रक्कम वर्ग केल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान उसाच्या खरेदीपोटी ऊस उत्पादक सभासदांना व गेटकेनधारकांना दिल्या जाणार्या उसाच्या पहिल्या हप्त्याबरोबरच बिगर अॅडव्हान्स ऊस तोडणी व वाहतूकदारांचे पहिल्या पंधरवड्याचे बिल देखील उद्याच दिले जाणार असल्याची माहिती काटे व पाटील यांनी दिली आहे. यंदाच्या हंगामात श्री छत्रपती कारखान्याने सभासद व गेटकेनधारकांचा मिळून नऊ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षी सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता कमी असल्यामुळे इतर कारखान्यांकडून श्री छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाची मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या संचालक मंडळाने सभासदांना त्यांचा ऊस हा फक्त छत्रपती कारखानालाच पुरवण्याची विनंती केली व आवाहन केले आहे. त्याबरोबरच तीन हजार रुपये प्रतिटनी उसाचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केलेली होती. दरम्यान गेल्या चार वर्षांपासून श्री छत्रपती कारखान्याला गेटकेन धारकांचा ऊस येतो, सभासदांच्या जोडीनेच त्यांनाही हा ऊस दर दिला जाणार आहे, अशी माहिती काटे व पाटील यांनी दिली.