वडूज – बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाचे जप्त केलेले दोन डंपर सोडवण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण धर्मराज नांगरे (वय 42, रा. तडवळे, ता. खटाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. याबाबत 32 वर्षीय तक्रारदाराने तक्रार नोंदवली होती.
याबाबतची माहिती अशी, यातील तक्रारदार बांधकाम साहित्याचा पुरवठा करतात. त्यांच्या मालकीचे दोन डंपर असून, त्यातून क्रश सॅंड आणि खडीची वाहतूक दि. 16 रोजी होत असताना, खटावच्या तहसीलदारांनी दोन्ही डंपर जप्त केले होते. हे डंपर सोडवण्यासाठी वडूज येथील तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण नांगरे याने तक्रारदाराकडे 55 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची पडताळणी करून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयात बुधवारी सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना प्रवीण नांगरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. प्रभारी पोलीस उपअधीक्षक सचिन राऊत, पोलीस निरीक्षक विक्रम पवार, हवालदार नितीन गोगावले, पोलीस नाईक गणेश ताटे, नीलेश राजपुरे, प्रियांका जाधव, नीलेश येवले, तुषार भोसले, शीतल सपकाळ यांनी ही कारवाई केली.