नव्याने दोन आरोपी अटक मोक्का न्यायालयाकडून 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पुणे – ड्रग माफिया ललित पाटील आणि मुख्य आरोपी अरविंद लोहारे या दोघांना पुण्यातही अंमली पदार्थ (एमडी) निर्मितीचा कारखाना उघडायचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. मात्र, विक्री करताना ललित पाटील पकडला गेल्याने त्यांचा डाव फसला. तसेच पूर्ण टोळीच पोलिसांच्या हाती लागली असून त्यांना मोक्काही लावला गेला आहे.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण टोळीतील आरोपी इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान याला कुर्ला ईस्ट येथून तर आरोपी हरिश्चंद्र पंत याला भोईसर मुंबई येथून बुधवारी पुणे पोलिसांनी अटक केली. या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. या सर्व आरोपींना मोक्का न्यायालयाने दि. 20 नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हरिश्चंद्र पंत याने शिंदे गाव एम आयडीसी नाशिक येथे सुरू केलेल्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्यामध्ये आरोपी ललित पाटील आणि अरविंद लोहारे यांच्या सांगण्यावरून फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण उत्पादन आणि विक्रीमध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
तर इमरान शेख उर्फ अतिक अमीर खान याला आरोपींनी नाशिक येथे उत्पादित केलेल्या मेफेड्रोनची मुंबई येथे विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुभाष जानकी मंडल, रौफ रहीम शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, अरविंदकुमार लोहारे आणि प्रज्ञा कांबळे यांना येरवडा कारागृहातून तसेच रेहान उर्फ गोलू याला तळेजा कारागृह, जिशान इकबाल शेख याला आर्थर कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे पुन्हा ताब्यात घेतले.
या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी सरकारी वकील चंद्रकिरण साळवी बाजू मांडली. तर प्रज्ञा कांबळे आणि रौफ शेख यांच्या वतीने शिवप्रसाद साळुंके यांनी काम पाहिले. साळवी यांनी युक्तिवाद केला की तपासादरम्यान या आरोपींकडून मेफेड्रोनची बाजारभावाप्रमाणे किंमत दोन कोटी चौदा लाख तीस हजार सहाशे एवढी आहे.
प्रज्ञा कांबळे हिचा जामीन फेटाळला
एमडी विक्रीतील पैशातून वेळोवेळी ललित पाटील, अभिषेक बलकवडे आणि भूषण पाटील यांनी तिला उदरनिर्वाहासाठी तसेच चारचाकी, मोबाईल घेण्यासाठी कॅश आणि अकाउंटवर पैसे दिले होते. आरोपी भूषण पाटील याच्या मोबाईलमध्ये जिशान शेख व प्रज्ञा कांबळे या दोघांचे एमडी फॅक्टरी व इतर बाबींवरील संभाषण पोलिसांना प्राप्त झाले आहे. मोक्काअंतर्गत तिला पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला.