Atul Benke : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर यंदाच्या दिवाळीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती. दरवर्षी पवार कुटुंब बारामतीतील गोविंदबागेत एकत्र येतात. यानिमित्त मोठ्या संख्येने नेते मंडळी, कार्यकर्ते देखील याठिकाणी येतात. मात्र यावेळी अजित पवार उपस्थित राहू शकलेले नाही. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी पाडव्यानिमित्त गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेतली.
यावेळी अतुल बेनके यांनी शरद पवार, अजित पवार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच राजकारणापेक्षा आमचे नाते कौटुंबिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीकडे रवाना झाले. येथे ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, बेनके यांनी अद्याप शरद पवार अथवा अजित पवार अशा कोणत्याच गटाला पाठिंबा दिलेला नाही. जून्नरकरांच्या कामासाठी मी कटीबद्ध असल्याचे बेनके यांनी सांगितले आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच आम्ही दिवाळी एकत्रित साजरी करू, असे स्पष्ट केले होते. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीत पवार कुटुंब खरेच एका मंचावर येतील का याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच आता अजित पवार गोविंदबाग येथे गैरहजर राहिल्याने काही नेते मंडळींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.