वडूज तहसीलमध्ये कुणबी कक्ष सुरू; तहसीलदार बाई माने यांची माहिती
वडूज – खटाव तालुक्यात 179 कुणबी नोंद असलेले मराठीमधील पुरावे उपलब्ध झालेले असून वरूड , औंध , भोसरे या गावांचा यामध्ये समावेश आहे. ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी असलेले अभिलेख असतील , त्यांनी तहसील कार्यालयातील विशेष कक्षाशी संपर्क साधावा. कुणबी जात पडताळणी करणेकामी खटाव तालुक्यामध्ये कुणबी नोंद तपासणी विशेष कक्ष स्थापन केला असल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली.
कुणबी प्रमाण पत्र पडताळणी बाबत जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य पुराव्याची तपासणी करण्यासाठी न्या. शिंदे साकेतीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने वंशावळी , शैक्षणिक पुरावे, महसुल पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तऐवज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी अशा पात्र 12 विभागातील पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्राहय धरले जातील असे स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने कुणबी जात पडताळणी करणेकामी खटाव तालुक्यामध्ये कुणबी नोंद तपासणी विशेष कक्ष स्थापन केलेला आहे.
खटाव तालुक्यातील कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज दि. 4 पासून सुरु आहे. त्यामध्ये एकूण 12,592 नोंदीची तपासणी आली आहे. उर्वरीत महसुली अभिलेख्यांची तपासणी करण्याचे कामकाज सुरु जाहे . सन 1886 ते सन 1912 पर्यंत, अभिलेख कक्षामध्ये उपलब्ध असलेल्या मोडी लिपीतील अभिलेख्यांची तपासणी सुरु आहे . तसेच सन 1913 ते 1969 या कालावधीतील मराठी मधील कुणबी मराठा , मराठा – कुणबीच्या नोंदी तपासण्याचे कामकाज सुरु आहे.
आत्तापर्यंत एकूण 179 कुणबी नोंद असलेले मराठीमधील पुरावे उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये वरूड , औंध , भोसरे या गावांचा समावेश आहे. कागदपत्र असल्यास सादर करा – खटाव तालुक्यातील ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंदी असलेले अभिलेख असतील , त्यांनी तहसील कार्यालयातील विशेष कक्षामध्ये शासकीय कार्यालयीन वेळेत नोडल अधिकारी महेश गायकवाड, निवासी नायब तहसीलदार यांचेकडे सादर करावेत असे आवाहन विशेष कक्ष समितीचे अध्यक्ष उज्वला गाडेकर , उपविभागीय अधिकारी माण – खटाव व तहसीलदार बाई माने यांनी केले आहे.