पुणे – दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंधेवर घाऊक आणि किरकोळ बाजर झेंडू, शेवंती आणि विविध प्रकारच्या फुलांनी बाजारपेठ सजली आहे. दुकाने, कार्यालये सजावटीसाठी या फुलांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते.
शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी फुले राखून ठेवली होती. त्यानुसार आवक वाढली आहे. बाजार समितीने शिवनेरी रस्ता आणि फुल, फळ बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील ट्रकच्या पार्किंगमध्ये शेतकऱ्यांना थेट फुले विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. पाडवा, भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर फुलांची आवक सुरूच राहणार आहे.
येथून होते फुलांची आवक
पुणे, सातारा, नगर, सोलापूर, बीड जिल्हा, तसेच अल्प प्रमाणात कर्नाटकात येथून फुलांची आवक झाली. तर शेवंतीची यवत, माळशिरस येथून आवक होत झाली. शहरासह उपनगरांतील विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी केली, असे व्यापारी अरुण वीर म्हणाले.
शनिवारी (दि.11) फुलबाजारात 1 कोटी 34 लाख 80 हजार रुपयांची उलाढाल झाली. झेंडूची 91 हजार किलो, पांढऱ्या आणि पिवळ्या शेवंतीची मिळून 85 हजार किलो आवक झाली आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी थेट 10 ते 12 टन फुलांची विक्री केल्याचा अंदाज आहे.