पिंपरी – दिवाळी सण तीन दिवसांवर येऊन ठेपला असून नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी दररोज मोठी गर्दी होत आहे. पिंपरीत कपड्यांसह इतर वस्तू कमी दरात आणि होलसेलमध्ये मिळत असल्याने खरेदीसाठी शहरासह लगतच्या भागातील नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प दिवसेंदिवस खरेदीचा हब बनत आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. चारही बाजूंनी शहर वाढत आहे. मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था उभारल्या जात आहेत. शहराची लोकसंख्या 27 लाखांच्या घरात गेली आहे. पिंपरी कॅम्प ही शहरातील सर्वांत मोठी घाऊक व किरकोळ बाजारपेठ आहे. किराणा मालापासून दागिने, कपडे, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, इलेक्ट्रीक साहित्य येथे मिळते. त्यामुळे लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव दाभाडे येथील छोट्या दुकानदारांसह शहरातील महिन्याचा किराणा भरणारे नागरिक कॅम्पातच खरेदीसाठी येतात. याशिवाय चऱ्होली, डुडुळगाव, मोशी, चिखली, रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड या परिसरातील शेतकरी सकाळीच भाजीपाला घेऊन येथे येतात. फूलबाजारही येथेच आहे. त्यामुळे मोठी वर्दळ असते.
पिंपरीतील बाजारपेठेत कमी दरात साहित्य मिळते. पिंपरीतील व्यवसाय उलाढालीवर चालतो. पुण्यापेक्षा पिंपरीतील दरात तफावत असल्याचे कॅम्पातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात नागरिकांची झुंबड उडायला लागली आहे. सायंकाळनंतर कॅम्पातून चालता येत नाही, एवढी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहनांच्या रांगा लागत आहेत. पिंपरीत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
नामांकित कापड व्यावसायिकांनी शाखा सुरू
शहर वाढत असल्याने मागणीही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील नामांकित कापड व्यावसायिकांनी आपल्या शाखा पिंपरीत सुरू केल्या आहेत. नामांकित कापड व्यावसायिकांनी शहरात मोठी दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्येही खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.
होलसेल बाजारपेठ विकसित
पिंपरी कॅम्पात मोठ-मोठे व्यावसायिक आहेत. या व्यावसायामुळे पिंपरीत होलसेल बाजारपेठ विकसित होत आहे. सर्व वस्तू पिंपरीत मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील छोटे-मोठे व्यापारी खरेदीसाठी येतात.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसह आदी साहित्य खरेदीसाठी नागरिकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
रमेश चौधरी, किराणा व्यापारी