सातारा – पर्यटनस्थळाचा “क’ वर्ग असलेल्या चवणेश्वर (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदाचा मान सौ. पूजा विशाल शिंदे यांनी मिळवला आहे. सदस्यपदांच्या चार जागाही बिनविरोध झाल्या असून, उर्वरित तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. श्री चवणेश्वर यात्रेच्या दिवशी मतदान असल्याने ग्रामस्थांनी एकजूट दाखवत निवडणूक बिनविरोध केली आहे.
सरपंच दयानंद शेरे व सदस्यांचा कार्यकाल संपल्याने गेले काही महिने चवणेश्वर ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये चवणेश्वरचाही समावेश होता. या निवडणुकीसाठी मतदान दि. 5 नोव्हेंबरला होणार आहे. त्याच दिवशी श्री चवणेश्वराची वार्षिक यात्रा आहे. निवडणुकीमुळे ही यात्रा होणार की नाही, अशी परिस्थिती होती. निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन तहसीलदार संगमेश कोडे, तलाठी शिंदे, प्रशासक सुनील चिकणे व ग्रामसेवक दीपक गाढवे यांनी केले होते.
गेल्या निवडणुकीत चवणेश्वर ग्रामपंचायतीसाठी मतदान झाल्याने, यावर्षी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होती. मात्र, यात्रा महत्त्वाची असल्याने, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पत्रकार संतोष पवार, पोलीस पाटील किरण पवार, माजी सरपंच दयानंद शेरे, सुरेश सूर्यवंशी, हरिदास शेरे, उद्धव पवार, हणमंत सूर्यवंशी, युवराज शेरे, विशाल शिंदे, सचिन गुरव, राजेंद्र सपकाळ, करंजखोपचे धनंजय धुमाळ, पिलाजी धुमाळ यांनी प्रयत्न केले. चवणेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या लोकनियुक्त सरपंचपदी पूजा शिंदे, सदस्यपदी संतोष पवार, सौ. माधुरी शेरे, सौ. अश्विनी सूर्यवंशी, अमोल शेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
गावाने घडवला इतिहास
वाई व कोरेगाव तालुक्याच्या सीमेवरील अवघ्या 50 घरांचे गाव असलेल्या चवणेश्वरमध्ये 99 टक्के लोक मागासवर्गीय समाजातील आहेत. सर्व समाजाला संधी मिळावी, या हेतूने ग्रामस्थांनी एकत्र येत पूजा शिंदे यांना पहिल्या लोकनियुक्त सरपंच करुन इतिहास घडवला आहे. सर्व समाजघटकांना सर्वच क्षेत्रात संधी मिळावी, यासाठी छोट्या गावाने मोठा विचार करुन वेगळेपण सिद्ध केले आहे.