पारनेर – नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातर्फे दरवर्षी काढण्यात येणाऱ्या मोहटादेवी यात्रोत्सवातील तिसऱ्या दिवशी माता-भगिनींच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र पहावयास मिळाले. मोहटादेवीकडे प्रस्थान करण्यासाठी पारनेरच्या क्रीडा संकुलावर एकत्रित जमलेल्या माता-भगिनी गायल्या, नाचल्या आणि फुुगड्याही खेळल्या! आ. नीलेश लंके क्रीडा संकुलावर पोहोचल्यानंतर महिलांनी अनोखे स्वागत केले.
आ. लंके म्हणाले, इतके मोठे कुटुंब बरोबर घेऊन जात असताना थोडाफार त्रास होत असतो. पण थेट देवाच्या दारात जाऊन व्हीआयपी दर्शन घेतले, तर देव कधी पावत नाही. मी आमदार असलो तरी व्हीआयपी दर्शनाचा आग्रह केला तरी रांगेतूनच दर्शन घेतो. माता-भगिनींनी मोहटादेवी यात्रेचा आनंद घ्यावा. यात्रेत फेरफटका मारावा असे सांगतानाच यंदा रस्ता चांगला झाल्याने तुम्ही लवकर घरी पोहोचणार आहात.
माता भगिनींचा लोकनेता!
ज्याला स्त्री ही मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला, बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला, आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्रीसुद्धा एक माणूस आहे हे समजले तो माता-भगिनींचा लोकनेता झाला, असे सांगत जितेश सरडे यांनी आ. लंके हे माता-भगिनींसाठी आयोजित करीत असलेल्या देवदर्शन यात्रेचे समर्थन केले.
मला महाराज करायचं डोक्यात आहे काय ?
आ. लंके हे भाषण करीत असताना एक वृद्धा आ. लंके यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करीत होती. आजीच्या डोक्यात असेल अजून दोन-चार माळा घाल आणि जा हिमालयात! मला महाराज करायचं डोक्यात आहे? अशी वेळी मिश्किली लंकेनी केली.