नवी दिल्ली -कर्नाटकस्थित कंत्राटदारांशी संबंधित बंगळुरूमधील काही ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने (Income tax) शुक्रवारी छापे (Raid) टाकले. त्या कारवाईवेळी तब्बल 42 कोटी रूपयांची रोकड जप्त (42 crore cash seized) करण्यात आली.
करचुकवेगिरीच्या आरोपावरून कर्नाटकमधील काही कंत्राटदार प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. त्यातून प्राप्तिकर विभागाने विविध ठिकाणी तपासणी केली. त्या छापासत्रावेळी एका घरात प्रचंड रोकड साठा सापडला. ती रोकड खोक्यांमध्ये भरून ठेवण्यात आली होती. रोकड मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या पथकाने अतिरिक्त मनुष्यबळ मागवले. तसेच, काऊंटिंग मशिन्सचा वापर करण्यात आला.
कर्नाटकच्या (Karnatak) शेजारील तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेली रोकड वापरली जाणार होती का, या दिशेने आता प्राप्तिकर विभागाने तपास सुरू केला आहे. दरम्यान, रोकड जप्तीवरून कॉंग्रेस आणि भाजप या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी पैसा उपलब्ध करण्याच्या उद्देशातून कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने कंत्राटदारांकडून कमिशन गोळा केल्याचा आरोप भाजपने केला. तर, भाजपचा आरोप निराधार आहे. भाजपची सत्ता असणाऱ्या ठिकाणी असे छापासत्र घडणार नाही, असा पलटवार कॉंग्रेसने केला.