पुणे – माहेरहून घर बांधण्यासाठी पैसे न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे डोके धडावेगळे करणाऱ्या पती, सासऱ्याला न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी 60 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तर, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासूला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट यांनी सुनावली. दंडाच्या रक्कमेपैकी 1 लाख रुपये मयत विवाहितेच्या आई-वडीलांना द्यावे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील ऍड. लीना पाठक यांनी केली. त्यांनी 15 साक्षीदार तपासले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी प्रकरणाचा तपास केला.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आहेत. जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पृथ्वीराज ताटे, सत्र न्यायालय पैरवी अंमलदार सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचित, कोर्ट पैरवी हवालदार एस.बी.भागवत यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.
पती कांताराम सत्यवान ढगे (वय 27), सासरे सत्यवान बबन ढगे (वय 57) अशी जन्मठेप सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर सासू बायसाबाई ढगे (वय 40, रा.आपटी, ता.शिरूर) यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दिपाली कांताराम ढगे (वय 24) असे खून झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. 10 एप्रिल 2013 रोजी ही घटना घडली. घर बांधण्यासाठी 2 लाख रूपये घेऊन ये. नाहीतर आई-वडिलांना घर बांधून द्यायला सांग, असा तगाता आरोपींनी सातत्याने दीपाली यांच्याकडे लावला.
त्यांचा छळ करत मारहाण केली. पैसे आणि घर बांधून दिले नाही म्हणून आरोपींनी तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीचे डोके धडावेगळे करून अज्ञात स्थळी टाकून दिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.