वसंतराव मोहिते; संस्थेचा 25 कोटींचा एकूण व्यवसाय, सभासदांना सात टक्के लाभांश
रेठरे बुद्रुक – सभासद, ठेवीदार, कर्जदारांच्या विश्वासामुळेच संस्थेची भरभराट झाली आहे. संस्थेस साताऱ्यासह लगतच्या जिल्ह्यात कार्यविस्तारास परवानगी मिळाली असून ही सर्व सभासदांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन ब्रह्मदास पतसंस्थेचे संस्थापक संचालक वसंतराव मोहिते यांनी केले.
बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील ब्रह्मदास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात शुक्रवार, दि. 29 जुलै रोजी संस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन मारुती मोहिते (आबा), व्हॉइस चेअरमन महादेव मोहिरे, लेखापरीक्षक संपत शिंदे, माजी सरपंच पांडुरंग मोहिते, माणिकराव मोहिते, बेलवडे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन जयवंतराव मोहिते, माजी चेअरमन मकरंद मोहिते, जयसिंग मोहिते, भरतसिंह मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मोहिते म्हणाले, संस्थेच्या शेणोली स्टेशन शाखेची स्वमालकीची इमारत बांधण्याचे काम सुरू असून येथील गाळ्यांच्या माध्यमातून संस्थेस आर्थिक उत्पन्न मिळेल. संस्थेचे दुध संकलन केंद्र अविरत चालू आहे. कासारशिरंबे शाखेच्या जागेस सुरक्षा कंपाऊंड करण्यात येणार आहे. सर्व सभासद, ठेवीदारांचे हित जोपासण्यावर संस्थेचा नेहमीच भर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संस्थेचे चेअरमन मारुती मोहिते यांनी संस्थेच्या सभासदांना सात टक्के लाभांश जाहीर केला. लेखापरीक्षक संपत शिंदे म्हणाले, सहकार महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहिला नसून सहकारात अमुलाग्र बदल होत आहे. ठेवींमध्ये दरवर्षी 15 हक्के वाढ, कर्जांच्या 60 टक्के वितरण, दरवर्षी 5 टक्के सभासद वाढ आदी. सर्व गोष्टींची पूर्तता ब्रह्मदास पतसंस्थेने केली असून संस्थेची एकूणच वाटचाल कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.
संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना व्यवस्थापक उमेश पाटील म्हणाले, संस्थेचा एकूण व्यवसाय 25 कोटींवर गेला आहे. 70 लाख 56 हजारांचे वसूल भाग भांडवल, 13 कोटी 36 लाख 55 हजार रुपयांच्या ठेवी असून संस्थेस दहा लाख 73 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. पोपटराव मोहिते-काजारी सर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संचालक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्लार्क प्रवीण मोहिते यांनी आभार मानले.
महिला पतसंस्थेचे कार्य आदर्शवत
ब्रह्मदास महिला पतसंस्थेच्या दोन कोटी 13 लाखांच्या ठेवी, एक कोटी 65 लाख कर्ज वितरण, तर संस्थेस दोन लाख रुपयांचा नफा झाला असून संस्थेचे कार्य आदर्शवत असल्याचे मत चेअरमन उज्ज्वला मोहिते यांनी संस्थेच्या वार्षिक सभेत व्यक्त केले. यावेळी व्हाइस चेअरमन उषा मोहिते, व्यवस्थापक स्वाती मोहिते, सर्व संचालिका व सभासद उपस्थित होते. क्लार्क विश्वास शेवाळे यांनी आभार मानले.