मुंबई – दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा लोकप्रिय शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कॉफी विथ करण’ चा आठव्या सीझनची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच करणने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पुन्हा एकदा या शोच्या माध्यमातून करण प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने चाहते देखील आनंदी आहेत
करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो डबल रोलमध्ये दिसत आहेत . तसेच तो स्वत:लाच ट्रोल करताना दिसत आहे. हे दोन करण कॉफी विथ करणच्या गेल्या सीझनबाबत चर्चा करताना दिसत आहेत. त्यापैकी एक करण हा कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या आठव्या सीझनची घोषणा करताना दिसत आहे. करणने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, ‘असे झाले की, माझ्या स्वतःच्या Konscience (विवेक) ला मला ट्रोल करायचे आहे! पण त्याला काय वाटते त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी सीझन 8 साठी तयार करत आहे!’
कॉफी विथ करण सीझन 8 हा चॅट शो डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 26 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या इतर सीझन प्रमाणेच यंदाही बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावणार आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या सात सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कॉफी विथ करणचे सातही सिझन सुपरहिट ठरले होते. सारा अली खान, जान्हवी कपूर आणि रणवीर सिंह अनेक कलाकार उपस्थित राहिले होते.