मुंबई – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार(Mla Rohit Pawar) यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बारामती ऍग्रो (Baramati Agro) कंपनीचे दोन प्लांट बंद करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर शुक्रवारी रोहित पवार यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दुपारीच हायकोर्टाकडून दिलासा दिला आहे. बारामती ऍग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने (High Court) दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस देत बारामती ग्रोचे दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी रोहित पवार यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 72 तासांची मुदत देखील देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी हायकोर्टात रोहित पवार यांनी धाव घेतली.
रोहित पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. बारामती ऍग्रो कंपनीवर 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला आदेश दिले आहेत. तर बारामती ऍग्रो बाबत पुढील सुनावणी ही 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
ही सूडबुद्धीने कारवाई : रोहित पवार –
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावल्यानंतर रोहित पवार यांनी ट्वीट करत कारवाईची माहिती दिली. सरकारविरोधात भूमिका घेत असल्यामुळेच माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे.
मात्र आम्ही घाबरणार नाही. राज्यातील 2 ज्येष्ठ नेत्यांनी माझ्या वाढदिवसा दिवशी मला जरी गिफ्ट दिल असले तरी आगामी निवडणुकांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेच्या माध्यमातून त्यांना रिटर्न गिफ्ट मिळेल, असेही पवार यांनी म्हटले. तर शरद पवार गटाने राज्य सरकारवर टीका करताना, “राजकीय नाकेबंदी करता येत नाही म्हणून सूडबुद्धीने कारवाई करत आहेत,’ असे म्हटले आहे.