मुंबई – ‘जवान’ पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये तुफान कमाई करत आहे. चित्रपटाची बंपर ऍडव्हान्स बुकिंग झाली होती आणि आता जवानच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे ट्रेंडही येऊ लागले आहेत, त्यानुसार शाहरुख खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. ‘जवान’ चित्रपटात प्रेक्षकांना साऊथचा तडका, बॉलिवूडचा मसाला बघायला मिळतो आहे.
जवान सर्व भाषांमध्ये रिलीज झाला असून, चित्रपटाने 75 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर जवानने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने जवळपास 120 कोटींची कमाई केली आहे. हे सुरुवातीचे ट्रेंड असले तरी अधिकृत आकडे आल्यावर हा आकडा बदलू शकतो.
या दरम्यान आता चित्रपटातील एक खास सरप्राइज उघड झाला आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये एक मोठा अभिनेता पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा होती. या यादीत अल्लू अर्जुन, थलपती विजयपर्यंत अनेक सुपरस्टार्सची नावं घेतली जात होती. मात्र आता त्या नावावरून पडदा उचलण्यात आला आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हा पडद्यामागील चेहरा पाहता येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच अभिनेता ‘संजय दत्त’ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला आहे. संजू बाबाची सरप्राइज एण्ट्री पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. ट्विटरवर नेटकरी त्याच्या भूमिकेचं तोंडभरून कौतुक करत आहेत. सिनेमातील त्याच्या सरप्राइज एण्ट्रीचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.