मुंबई :- येस बॅंक घोटाळा प्रकरणातील आरोपी कपिल वाधवान याला रुग्णालयात गैरवर्तणूक केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कारागृहात हलविण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने अधिकाऱ्यांना तशी अनुमती दिली आहे.
वाधवान हा दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्रवर्तकांपैकी आहे. अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या गुन्ह्यातील तो आरोपी आहे. त्याला आत्तापर्यंत तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. न्यायालयाच्या अनुमतीनंतर त्याला तातडीने नाशिकला हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रुग्णालयात उपचार घेण्याच्या नावाखाली वाधवान बंधू तेथे पूर्ण मोकळीक अनुभवत होते व मौजमजाही करीत होते, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कपिल वाधवान याला कोणताही आजार नसताना त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी काही पोलीस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.