मुंबई – अभिनेत्री कोंकणा सेनला ‘वेक अप सिड’ या चित्रपटाद्वारे खरी लोकप्रियता मिळाली. मात्र आता कोंकणाच्या एका विधानामुळे ती चर्चेत आली आहे. कोंकणाची आई अपर्णा सेन या तिला रामायण आणि महाभारत पाहायला नव्हत्या. त्यासोबत तिची आई अमेरिकी सोप ओपेरा देखील पाहू देत नव्हती. मात्र या मागचे नेमकं कारण काय होते? याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत कोंकणा सेन म्हणाली की, “आईने मला टीव्हीवर रामायण आणि महाभारत पाहायची परवानगी नव्हती. मी हे महाकाव्य आधी वाचले पाहिजेत मग बघितले पाहिजेत असं मला आईने सांगितले होते. या महाकाव्यांना तुम्ही इतरांच्या कल्पनेने नाही तर आधी स्वत:च्याच कल्पनेने जाणून घेतलं पाहिजे. आता मी बरेच वैश्विक आणि क्षेत्रीय चित्रपट बघितले आणि भारतीय साहित्य वाचले आहेत.” याशिवाय तिला हिंदी आणि बंगाली चित्रपट आणि द बोल्ड अॅन्ड द ब्यूटीफुल किंवा सांता बारबरा सारख्या अमेरिकेच्या सोप ओपेरा पाहण्याचीही परवानगी नव्हती, असे कोंकणाने सांगितले.
पुढे कोंकणा सेन म्हणाली, ‘मी फक्त एक लहान मुलगी होती. पण ज्या प्रकारे त्यांनी मला मोठं केलं. मला नेहमीच स्वत: एक स्थान दिलं. मी लहानाची मोठी असताना तिने मला मोठ्यांसारखीच वागणूक दिली. मला माझी स्पेस दिली. यामुळे मला खूप मदत मिळाली.’
दरम्यान, कोंकणा नुकतीच ‘कुत्ते’ या चित्रपटात दिसली होती. अभिनयासह तिने दिग्दर्शनाची धुराही उत्तम रित्या संभाळली आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’ आणि ‘द मिरर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तिने केले आहे. त्यानंतर आता ती ‘सूप’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.