पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघे तब्बल साडेआठ वर्षांनी पुण्यात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्यात सतत काही ना काही राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी व शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यापूर्वी दि. 14 फेब्रुवारी 2015 रोजी बारामतीमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी एकत्र आले होते. त्यानंतर आता साडेआठ वर्षांनी पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र येत आहेत. दिल्ली सरकारच्या अधिकारांबाबत केंद्र सरकारच्या विधेयकावर मंगळवारी (दि.1) राज्यसभेत चर्चा होणार असून त्यावर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता पवार हे पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.
मेट्रो प्रकल्पाचेही उद्घाटन
पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. सन 2016 मध्ये मोदी यांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महापालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडणार आहेत.
असा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दि. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार उपस्थित राहणार आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11.45 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमापूर्वी मोदी सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. शिवाजीनगर येथे दुपारी 12.45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
अन्य प्रकल्पांचे लोकार्पण
पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणीही मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकाअंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे हस्तांतरण मोदी यांच्या हस्ते होणार आहे.